Sunday, August 29, 2010

वैचारिक प्रबोधन

"आजोबा, मी जिम ला जाऊन येतो". चिंटूने दार लोटत आरामखुर्चीत पहुडलेल्या आजोबांना सांगितलं. 'जिम' या आधुनिक व्यायामशाळेच आजोबांना फार कुतूहल वाटे. पैसे मोजून घाम गाळायला लोक तिथे का जातात हे त्यांना न उलगडलेलं कोड होत. पण तेही बरोबरच म्हणा. एअर-कंडीशन्ड घर ते एअर-कंडीशन्ड ऑफिस हा प्रवास एअर-कंडीशन्ड गाडीतून करणाऱ्यांचा घाम गाळणे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. आणि 'हार्ट' ला अटक होऊन घाम फुटण्यापेक्षा आधीच पैसे मोजून का होईना पण तो गाळलेला बरा याच तत्वाने लोक हा आर्थिक बोजा आणि पर्यायाने जिम मधली 'वेट्स' उचलत असतील अशी आजोबांनी स्वतःची समजूत घातली होती. त्यांच्या काळात मात्र असं काही नव्हत. शरीरसौष्ठवा करता आखाडे असत. ते स्वतः काही पैलवान नव्हते, पण मित्रांच्या आग्रहाखातर ते बरेचदा आखाड्याच्या लाल मातीत दोन हात करायला उतरले होते. आता मात्र आखाडे दिसेनासे झाले होते. जणू काही त्याच लाल मातीत मिळाले होते. त्यांची जागा आता गल्लोगल्ली असलेल्या जिम्स नी घेतली होती. असं यांत असत तरी काय म्हणून आजोबा एकदा आवर्जून चिंटूसोबत त्याच्या जिम मधे गेले होते. सगळीकडे लोक वजन उचलत होती. उचलतांना समोर असलेल्या आरश्यात स्वतःला बघत होती. जसं गाडीच्या आरश्यांवर 'objects in the mirror are closer than they appear' असं लिहिलेलं असत, तसंच इथल्या आरश्यांवर सुद्धा 'objects in the mirror are smaller than they appear ' असं लिहायला हवं असं तेव्हा आजोबांना उगाचच वाटल होत. "अहो आजोबा हे 'modern' युग आहे", चिंटूने एकदा आजोबांना म्हटलं होत. कलियुगाच इंग्लिश नाव!

या कलियुगाची आणखीन एक देण म्हणजे या 'modern' नट्या उर्फ हिरोइन्स. आजोबांच्या काळातील नट्या हातभर पदर असलेल्या साड्या घालत आणि तरीही झाडामागे लपून गाणी म्हणत. आजकाल हातभर कपडा सुद्धा अंगावर नसतो, तेवढा पदर असलेली साडी तर दूरच. आणि त्या झाडाची जागा एका खांबाने घेतलेली दिसते ज्याला 'पोल' म्हणतात. त्यातल्या त्यात मल्लिका कि कोणी हिचा तर आजोबांनी t.v. वर एक-दोनदा दर्शन झाल्यावर धसकाच घेतला होता. ह्या बयेने तर अंगावरील सर्व वस्त्रांना ‘निराधार' करण्याचा निर्धारच केलेला होता. पु. लं च्याच शब्दात सांगायचं झाल तर एखादा गंभीर साहित्यिक हे सगळ बघितल्याने (किंवा न बघवल्याने) ‘भारतीय संस्कृतीची विस्कटत चाललेली घडी’ (घडीवरून आठवलं - मल्लिकाला तिच्या कपड्यांची घडी घालण फार सोप्प असेल!!) असा एक लेख लिहून काढील. परवाच वर्तमानपत्रात त्यांनी बेरी या आडनावाच्या हॉलीवूड मधल्या ऑस्कर विजेत्या अभिनेत्रीच 'न्युडीटी हा एक लिबरेटिंग अनुभव असल्याचा' लेख वाचला होता. आता एवढ्या अनुभवी लोकांचे साक्षात्कार ऐकून(आणि पाहून) जर आजकालच्या पिढीचे वैचारिक प्रबोधन न व्हावे तरच नवल. त्यांची तरी काय चूक. यालाच आधुनिकता म्हणत असावेत. नट्यांचे कपडे तोकडे आहेत असे वाटणारे आपले विचारच तोकडे आहेत असे चिंटूला वाटणारच.

आजोबांनी आणि त्यांच्या मित्रांनी मिळून सोसायटीतील लहान मुलांकरता 'संस्कार वर्ग' चालवले होते. कुठे ही जाताना 'कार'मध्ये फिरणाऱ्या या पोरांना आधी तर संस्कार म्हणजे कुठलीही कार नसून जीवनात प्रत्ययात आणायच्या चांगल्या गुणांची शिकवण हे सांगावे लागले. संस्कृतीचे हे वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडेच का वाहतात असाही आजोबांना प्रश्न पडे. (तस मध्यंतरी रॉबर्ट्स म्हणून एका अमेरिकन नटीने हिंदू धर्म स्वीकारल्याचीही बातमी होती. पण तो पब्लीसिटी करता असण्याचीच शक्यता जास्त होती.) 'लो वेस्ट' जीन्स घालून 'गो वेस्ट' म्हणणारी कार्टी सगळीकडे फिरतांना दिसतात. आपल्या लोकांना पाशात्य संस्कृतीचे(?) एवढे आकर्षण असण्यामागे काय कारण असावे. कदाचित कुठेतरी हेच संस्कार नवीन पिढीला जाचक वाटत असावेत आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे पाशात्याच विद्वान असा (गैर)समज होत असावा. पण या विद्वत्तेला सरळ मुर्खात न काढता आपल्यालाही थोडं अकोमोडेटिंग व्हाव लागेल. तेव्हाच ही 'जेन-नेक्स्ट' आपले संस्कार अकोमोडेट करेल.

आजोबांची देवळात जायची वेळ झाली होती. मल्लिकाच्या कपड्यांची लांबी-रुंदी वाढो वा न वाढो, आपल्या विचारांच्या कक्षा रुंद करायलाच हव्यात. त्यांनी आरामखुर्चीतून उठत स्वतःशीच ठरवले.

4 comments:

  1. अगदी खरंय, आजोबा! ;)
    Westernization च्या नावाखाली आपण भारतीय अमेरीकेची हूबेहूब नक्कल करतोय. ज्या भारतीय संस्कृतीचा आपण एवढा गाजावाजा करतो, तीच आपण विसरत चाललोय. We need to draw a line somewhere and take only good things from the West, while ensuring that we don't lose our hard-earned values.

    ReplyDelete
  2. andy...this is awesome article.. i liked it very much..:) Keep up the good work... !

    ReplyDelete