Sunday, March 25, 2018

'केस' Study


'केस' Study

'Grow Hair, Grow Confidence' अश्या शीर्षकाचे डॉक्टर बत्रांचे -मेल पाहून मी विचारात पडलो. आपल्या गळणाऱ्या केसांची बातमी डॉक्टर बत्रांपर्यंत कशी पोहोचली या चिंतेने आणखीन काही केस गळायचे अशी भीतीही वाटून गेली. तशी ही  सव्वा लाखाची मूठ आता झाकून ठेवणे शक्य नव्हती याची जाणीव मला झालेली होती.

 समोरच्याशी बोलताना त्याची नजर माझ्या नजरेला सोडून जेव्हा सारखी वरती सरकायला लागली,तेव्हाच मला चमकले की आपल्या  डोक्यावरील चमक बरीच वाढलेली आहे. फ्रँटलाईन वरील बऱ्याच सैन्याने आधीच माघार पत्करली होती. त्यामुळे कपाळाचे रणांगण बरेच प्रशस्त झाले होते. पण आत्तापर्यंत गड राखून असलेल्या माथ्यावरील केसांनी सुद्धा पलायन सुरु केलेले होते. त्यामुळे मामला बराच गंभीर होत चालला होता. 'बाल बाल बचे' याचा खरा अर्थ मला कळू लागला होता.  थोडक्यात 'कॉमन मॅन' सोबतचे माझे साम्य वाढत होते. लहानपणीचे गरजेपेक्षा जास्त केस असलेले आपले फोटोज पाहून 'तो मी नव्हेच ' असे वाटायला लागले होते.  "आता लग्न झालंय , मग काही टेन्शन नाही " या आईच्या वाक्याने फारसा दिलासा दिला नव्हता. मात्र ऑस्ट्रेलियातील कोरियन नाव्ह्याने सुद्धा जेव्हा "you are married, not worry" असे त्याच्या इंग्लिश मधे म्हटल्यावर मात्र खरंच केसांची गरज पोरीने पसंत केल्यावर फारशी उरत नसावी अशी मी आपली समजूत घालायला लागलो.  पण आपल्या मूव्हीज आणि गाण्यांनी केसांना दिलेल्या आत्यंतिक महत्वाला पाहून मला चीड यायला लागली. 'उडे जब जब जुल्फे तेरी ' असली गाणी आणि झुबकेदार केस असलेले हिरोज मी अव्हॉइड करू लागलो. जेसन स्टेथॅम आणि ब्रुस विलीस या मंडळींवरील माझी आस्था वाढू लागली. सोबतीला नानाविध उपायांची जोड होतीच. सौ ने या विषयावर बराच रिसर्च करून माझ्यावर प्रात्यक्षिक सुरु केले होते. कांद्याचा रस, अंडी, दही, तेल आणि शॅम्पूज अश्या पंचामृताचा अभिषेक होत होता. पण जानेवाले को कौन रोक सकता है या तत्वाने केसांचे पलायन सुरूच होते. कटिंग ची पाळी महिन्याऐवजी दोन महिन्यांवर आली होती. तसे एका समदुःखी मित्राने यशस्वी केशारोपण करून आशेचा किरण दाखवला होता. पण शस्त्रांशी डोकं लावण्याची माझी तयारी नव्हती.

हळू हळू मात्र मला मी नुसता विद्वानच नसून विचारवंत असल्याचा (गैर)समज व्हायला लागला. 'Go Bald, Go Bold' असली पंचलाईन्स सुचायला लागली.  डोक्यातून (नव्हे टक्कलातून ) अश्या विचारांची उत्पत्ती होण्याचे कारण म्हणजे डोकं बरच सुपीक झालेलं होत.  सूर्याची किरणे असोत किंवा पावसाचे थेंब असोत, त्यांचा इतरांपेक्षा माझ्या डोक्यावर जास्त परिणाम व्हायला लागला. कारण ते थेट मेंदूपर्यंत पोचत होते.
आपल्याला पडणारे टक्कल हे नुसते वाढत्या वयाचे नाही, तर  वैचारिक प्रगल्भतेचे सुद्धा लक्षण असल्याचे उगाच समाधान वाटायला लागले. आता फक्त सेल्फीजचाच प्रश्न उरला होता. मग शेवटी टक्कल लपवणाऱ्या अँगल्सचा सुद्धा शोध लागला आणि केसांची ही बिकट केस निकालास लागली. :)