मराठीतला हा माझा पहिलाच ब्लॉग. मातृभाषेवर प्रेम नाही अशातला भाग नाही, पण IT 'त आल्यापासून मराठी लिखाण परकं झालं. मराठी संस्कृतीच्या माहेरघरात वावरतांना मात्र भाषाप्रेम उद्युक्त करणाऱ्या अनेक पाट्या आढळल्या. अंडर वेएर - बनियन च्या दुकानावर सुद्धा तसं न लिहून "पुरुषांची अंतर्वस्त्रे" अस लिहिलेलं पाहून मी चमकलो. "स्थापत्य आरेखन संपूर्ण संगणीकृत अभ्यासक्रम " याचा नेमका अर्थ न कळूनही मला माझ्या मराठीपणाचा गर्व वाटू लागला. त्यात भर घालायला जुनिअर ठाकरेंची भाषणे होतीच. अगदी परवाच मात्र "आला उन्हाळा, तब्येतीला सांभाळा; जिभेला जिंकणारा, चितळेंचा जिव्हाळा " हे वाचून तर मी पार भारावून गेलो. तेव्हाच ठरवलं. माझ एक तरी अनुभव वर्णन मराठीतून व्हायलाच हवं. परिणामस्वरूप, हा ब्लॉग.
कथेला(आणि व्यथेला) सुरुवात काही महिन्यांपूर्वी झाली, जेव्हा आमच्या दंत पंक्तीतील एका मेम्बर ने कुरकुर करायला सुरुवात केली. काही दिवस कानाडोळा केल्यानंतर मात्र मला मामला थोडा गंभीर वाटायला लागला. कारण तोपर्यंत आमच्या दाताने संपावर जाण्याची नोटीस पाठवली होती. माझ्यावर पहिल्यांदाच दातांच्या डॉक्टरकडे जायची पाळी आली होती. नाईलाजाने मी दवाखान्याची पायरी चढलो. मी गेलो तेव्हा नेमके डॉक्टरसाहेब घाईत होते. कुठे, काय आणि कसं दुखतंय याची चौकशी करून त्यांनी प्राथमिक चाचणी केली. थोडीफार ठोकपीट केल्यानंतर त्यांनी काळजीच कारण नाही म्हणून सांगितलं. पण तरी एकदा x -ray काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी दुसऱ्या दिवशी परत दवखान्यात पोचलो. डॉक्टरांनी एक कुठलीतरी चीप मला तोंडात धरायला दिली आणि एक कॅमेऱ्यासारख दिसणार उपकरण गालाजवळ आणलं. TV वर दिसणारं चित्र बघून त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या आणि माझ्या कपाळावर घाम! दोन दात खराब झाल्याची बातमी माझ्या कानांवर आदळली. अगदीच 'boundry case' असल्याच कळलं. सबंध शैक्षणिक आयुष्यात चांगल्या मार्कांनी पास होत आल्यामुळे हे विशेषण पहिल्यांदाच मला लागलं होतं. रूट कॅनल हा एकाच उपाय असल्याच मला सांगण्यात आलं.
मुळात माझ्या दातांची मुळ तर छान होती पण तरी हा प्रसंग आपल्यावर का ओढवला हे कळेना. लहानपणी एक
दात अर्धा तुटल्यानंतर बाकीचे साडे एकतीस गुण्या गोविंदाने नांदत होते. आईने तर याच खापर माझ्या ब्रिटेन मधील वास्तव्याच्या काळात खाण्यात आलेल्या अतोनात चॉकलेट्स वर फोडलं. आता काय म्हणता, आपलेच दात आणि आपलेच ओठ.म्हणून मी चूप राहिलो. तसं आजीचे पडलेले आणि बाबांचे पडतानाचे दात पाहून होतो. त्यामुळे दातांच दु:ख दुरून का होईना जाणून होतो. परंतु कितीही झालं तरी परदु:ख शिथील असतं. पुढचे काही दिवस चांगलेच त्रासदायक होते. कारण चावण्याच काम हे एकाच बाजूने होत होते. त्यामुळे मला मी रवंथ करत असल्यासारखे वाटू लागले. ते कमी होतं म्हणून कि काय काही लोकांनी चांगलेच भीतीदायक अनुभव ऐकवले. एकाने तर इंजेक्शन घेताना ते गालातून बाहेर आल्याचं सांगितलं. कसे बसे दिवस काढत मी रूट कॅनल होणार त्या दिवसाकरता सज्ज होत होतो.
शेवटी तो दिवस उजाडला. मी थोडासा घाबरतच दवाखान्यात पोचलो. एका भल्या मोठ्या खुर्चीवर मला बसवण्यात आलं. त्याला एक छोटासा TV पण होता ज्यावर कार्टून चालू होत. पण तरीही माझं लक्ष एका बाजूला ठेवलेल्या सगळ्या शस्त्रांवर गेलं. मी स्वताला दिलासा देत परिस्थितीशी दोन हात करायचं ठरवलं. पण ते दोन हात माझे नसून डॉक्टरचे होते याची भीती होती. मला मोठ्ठा आ करायला लावून डॉक्टरने आपले काम चालू केलं. आधी दोन इंजेक्शंस देण्यात आली. थोड्याच वेळात मला एका बाजूचा गाल गायब झाल्यासारख वाटायला लागल. त्यानंतर बराच वेळ वेगवेगळी शस्त्रास्त्रे माझ्या श्रीमुखात धुमाकूळ घालीत होती. मला त्यांची जाणीव होत नसली तरी त्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते. डॉक्टरसाहेब फार लक्ष देऊन त्याचं काम करत होते. मधून मधून मला तोंड बंद न होऊ द्यायला सांगत होते. श्रीकृष्णाने यशोदेला आपल्या बाललीलेत पृथ्वीच दर्शन मुखात घडवल होतं. माझ्या मुखात त्या दोन खराब झालेल्या दातांशिवाय त्यांना काही इंटरेस्टिंग आढळणार नव्हत. साफसफाई झाल्यानंतर सिमेनटिंग करण्यात आलं. तब्बल दीड तासानंतर माझी या प्रकरणातून सुटका आणि दंतकथेचा सुखद शेवट झाला.
इति आनंदपुराणे दंतकथाभ्याम प्रथमोध्याः समाप्त!
(या कथेतील सर्व पात्र, प्रसंग (आणि पाट्या) या वास्तविक असून त्यांचा कल्पनेशी कुठलाही संबंध आढळल्यास
तो निव्वळ लेखकाचा खोडसाळपणा समजावा. )